जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नंदगाव येथील शेतमजुराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. २८ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रतीलाल अंकुश भिल (४३, मूळ रा. मोहाडी, ह. मु. नंदगाव ता. जळगाव) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व दोन अविवाहीत मुली आहेत. विविध शेतात मजुरी काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते कामानिमित्त नंदगाव येथे राहत होते. शुक्रवारी त्यांनी घराच्या बाजूला असलेल्या एका शेडजवळील झाडाला गळफास घेतला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याचे शासकीय रुग्णालयात पाहायला मिळाले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.