पारोळा तालुक्यातील दळवेल येथील घटना
पारोळा (जळगाव) :- तालुक्यातील दळवेल येथील शेतकऱ्याने शेतीसाठी पीककर्ज घेतले होते. मात्र कमी उत्पन्नाने गणित बिघडले. यातून कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. हि घटना बुधवारी दि. ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
दीपक बाबूलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील यांनी शेतात कापूस व इतर पीक लावलेले होते. कमी पावसाळा व शेतीमालाला भाव नसल्याने नैराश्यात होते. शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून घेतलेले कर्ज कसे फिटणार, या गोष्टीची नेहमी चिंता करीत होते. कायम त्याच विचारात राहून त्यांनी बुधवारी सकाळी टोकाचे पाऊल उचलले.
दीपक पाटील यांनी राहत्या घरात शेतात पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याबाबत परिवारातील सदस्य व गावातील मंडळींनी त्यांना तत्काळ रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याबाबत हरेश्र्वर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.