भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता नसून दुप्पट वेगाने काम करा. नागरिक आता जागरूक झाले असून, विकास कामासंदर्भात ते जाब विचारतात. त्यामुळे निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
भुसावळ शहरात दोन कोटी 98 लाख रुपयांच्या निधीतून रस्ते नूतनीकरणाचा कामाचे उद्घाटन सरदार वल्लभाई पटेल पुतळ्याजवळ माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सभापती मुकेश पाटील, मुख्याधिकारी संदिप चिद्रावार, प्राध्यापक सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक गिरीश महाजन, नगरसेवक पिंटू कोठारी, प्रा. दिनेश राठी, परीक्षित बरहाटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. खडसे म्हणाले की, भुसावळ शहरातील या स्थानासंदर्भात खूप थकले होते मात्र अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याच्या कामांना सुरुवात होऊ शकत नाही ही तांत्रिक अडचण असल्यामुळे रस्ता दुरुस्तीला उशीर झाला यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर आम्ही पाठपुरावा करून ज्या ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम झाले आहे त्या भागात रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी घडवून आणली त्यामुळे रस्त्यांची समस्या सुटणार असल्याचे ते म्हणाले.
शहरातील प्रमुख रस्त्यांची समस्या आता मार्गी लागली असून, रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र अमर स्टोअर ते रेल्वे स्थानकापर्यंत जाणारा रस्ता रेल्वे हद्दीत येत असल्यामुळे याची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे या रस्ता संदर्भात रेल्वेच्या डीआरएम यांच्याशी चर्चा करून त्यांना रस्त्यात यासंदर्भात पत्र देणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीत शहरातील नागरिकांना रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि वीज या चार विषयांवर आश्वासनं दिली होती. मात्र रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अमृत योजनेच्या कामांमुळे शहरात खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता अमृतचा पाईपलाईनचे काम 87 टक्के झाले असून इतर काम 47 टक्के झाले आहे. जिथे पाईपलाईन टाकण्यात आली आहे तेथे आता रस्ते नूतनीकरण केले जातील. शहरातील रस्त्यांचे काम अमृत योजनेच्या पाईप लाईन मुळे थांबले होते. असे असताना कॉन्ट्रॅक्टर बदलणे अवघड होते, त्यामुळे या योजनेस आणखी दोन वर्षांचा विलंब झाला असता. तर दुसरीकडे पालिकेकडे सक्षम अधिकारी नव्हते, आता चांगले मुख्याधिकारी मिळाल्याने 25 कोटींच्या कामांना मान्यता दिली असल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले.