शिरपूर (प्रतिनिधी) — येथील पुलावरुन तापी नदीत शनिवारी सकाळी प्रेमी युगुलाने उडी टाकली. पट्टीच्या पोहणार्यांनी युवतीला तातडीने बाहेर काढल्याने ती बचावली. तीन तासानंतर युवकाचा मृतदेह हाती लागला. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर सोबत राहणे शक्य होणार नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे.

अमोल किशोर कोतकर (वय 31, रा.वारूळ-पाष्टे, ता.शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे शिरपूर फाट्यावर आशापुरी स्पेअर पार्टस् हे दुकान आहे. त्याचे दर्शना येवले (रा.नाशिक) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दर्शनाचे माहेर मालेगाव (जि.नाशिक) येथील असून सासर नाशिक येथील आहे. दोघेही नातलग असून काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेम फुलत गेल्यावर त्याची कुणकूण दर्शनाच्या सासरच्या लोकांना लागली. त्यांनी चौकशी करुन अमोल कोतकरशी तिचे संबंध असल्याचे हुडकून काढले. 15 ऑक्टोबरला तिला घेवून सासरचे कुटूंब धुळे येथे पोहचले. अमोल कोतकरलाही बोलावण्यात आले. तुमचे प्रेमसंबंध असतील तर घटस्फोट देऊन अमोलसोबत जा असे सासरच्या लोकांनी दर्शनाला सांगितले. मात्र तिच्या आईने घटस्फोटाला नकार दिला. अखेर दोन्ही बाजूंचे लोक नरडाणा येथे गेले. तेथे अमोलच्या कुटुंबाशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दर्शनाला घेऊन अमोल शिरपूरला निघून गेला.
शनिवारी अमोल व दर्शना आत्महत्या करण्याच्या हेतूने सावळदे येथे पोहचले. तेथील पुलावर पोहचल्यावर त्यांनी बाहेरगावी जाऊन एकत्र राहू असा विचार केला. तेथून दोघेही परत शिरपूरला आले. मात्र दोघेही विवाहित असल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतील, त्यापेक्षा मरण बरे अशा विचाराने ते पुन्हा सावळदे येथे पोहचले. सकाळी नऊला दोघांनी हातात हात घेऊन पुलावरुन उडी टाकली. त्याचवेळी नदीपात्रात सावळदे येथील पट्टीचे पोहणारे 15 ऑक्टोबरला बुडालेल्या एका युवकाचा शोध घेत होते. त्यांच्यापासून काही अंतरावरच दोघे पाण्यात पडले. त्यांनी लागलीच धाव घेवून दर्शनाला जिवंत बाहेर काढले. मात्र अमोल उडी टाकल्यानंतर थेट तळाशी गेल्याने त्याचा शोध लागू शकला नाही. तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला.
डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत यांनी मदतकार्य केले.
दर्शनाने दिली माहिती..
प्रारंभी याबाबत काहीच उलगडा होत नव्हता. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दर्शना येवले हिनेच अमोलबाबत माहिती दिली. आत्महत्येचे कारणही सांगितले. सोबत जगू शकलो नाहीत म्हणून सोबत मरण पत्करले होते, पण तिथेही नियतीने आमची ताटातूटच केली म्हणतांना तिला रडू कोसळले. अमोल कोतकरचा 26 ऑगस्टला विवाह झाला होता. लग्नानंतर त्याच्या व दर्शनाच्या प्रेमकथेला सुरवात झाली. तिच्या माहेरी संपर्क साधून या घटनेबद्दल सूचित करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत कोणीही पोहचले नव्हते. शिरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली







