अमळनेर तालुक्यातील सात्री येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सात्री गावातील बोरी नदी पात्रात एकाने लोखंडी तलवार काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांनी पकडून त्याला मारवड पोलीसांच्या स्वाधिन केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील सात्री गावातील बोरी नदीच्या पात्रात सिमांकन मोजणीचे काम करत असतांना संदीप सुरेश पाटील याने सिमांकन केलेल्या भागात अतिक्रमित केलेल्या शेतीचा भाग जात असल्याचे समोर आले. ही बाब संदीप पाटील यांनी त्यांचे शालक रामकृष्ण दिलीप काटे याला सांगितले. याचा राग आल्याने शनिवारी २ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामकृष्ण याने हातात लोखंडी तलवार घेवून नदीपात्रात येवून दहशत माजविली. गावकऱ्यांनी मिळून त्याला जागीच पकडले आणि मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी महेंद्र बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.