दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेला झाली सुरुवात, आज दोन फेऱ्या झाल्यात
जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी स्पर्धक खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ना जितने की खुशी ना हारने का गम, तुम ये खेल रहे हो ये क्या है कम” अशा शायराना अंदाजात सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
सौ. निशा जैन पुढे म्हणाल्या की, ‘तुमची ऊर्जा आणि जिद्द पाहून मन प्रसन्न होत आहे आपले मन एकाग्र करून खेळा.’ असे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छाही त्यांनी दिल्या. तत्पूर्वी सकाळी सर्व खेळाडूंची व त्यांच्या पालकांची स्पर्धेच्या ठिकाणी लगबग सुरू होती. काहींना आपल्या प्रतिस्पर्ध्याबाबत उत्कंठता व खेळाची रणनीतीची आखणी यावर चर्चा सुरू होती. अनुभूती स्कूलच्या क्रीडानुभूती या खेळाचा परिसरातील श्रद्धेय भवरलाल जैन यांनी म्हटलेल्या “खेळ म्हणजे निव्वळ शारीरिक व्यायाम नव्हे; ते तर तुमच्यात स्पर्धेचा जोश भरतात” या वाक्याला या साऱ्याचित्रामुळे स्पर्धकांसह पालकांमध्ये असलेला उत्साह व आनंद दिसून येत होता. खेळाडू मग्न होऊन आपल्या खेळात एकाग्र झालेले, व पालक बाहेर त्यांच्या मुलांच्या प्रतीक्षेत.