मुंबई – काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, ‘आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असलो तरी आम्हाला निर्णय घेण्याइतपत अधिकार नाहीत.’ असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा साधल्याच्या बातम्या आल्या व हे प्रकरण थंडावलं. अशातच आता राहुल गांधींच्या त्या वक्तव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांचं ते वक्तव्य योग्यच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राऊत यांना राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार असलं तरीही सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत.
त्यामुळे राहुल गांधी यांनी योग्यच सांगितलं.’ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल याबाबत कोणतीही शंका नसून सद्यपरिस्थितीत राजकारण करण्यापेक्षा कोरोनाविरोधात लढणे महत्वाचे आहे. असं देखील ते म्हणाले.