जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे पडलेल्या दरोडयाप्रकरणी २ संशयित अटक करण्यात आलेले असून आणखी ४ फरार संशयितांचा शोध सुरू आहे. यात ४ वाहने जप्त करण्यात आले असून ४८ लाख जमा करण्यात आली आहे, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील हे उपस्थित होते. महेश्वर रेड्डी पुढे म्हणाले की, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे व्यापाराचे १ कोटी ६० लाख रुपये लुटण्यात आले होते. या घटनेमध्ये संबंधित संशयित आरोपींनी कार चोरल्या. त्यानंतर चोपडा येथे घरफोडी करून त्यांनी धरणगाव येथे जबरी लूट केली.
या प्रकरणी मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (वय ३२) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय २९) या दोन्ही जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून आणखी चार संशयित आरोपींना अटक करण्याच्या हालचाली सुरू झालेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.