भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील घटनेचा पोलिसांनी केला उलगडा
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिचर्डे गावात झालेला खून हा जमिनीचा वादातून असल्याचा छडा पोलिसांनी दोन तासातच लावून संशयित मोठ्या भावाला अटक केली आहे. सख्ख्या मोठ्या भावाने गोठ्यात झोपलेल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत त्याचा खून केला. हा थरार सोमवारी गावाबाहेरील गावठाण जागेवर असलेल्या खळ्यात सकाळी ९:३० वाजेपूर्वी घडला.
विठ्ठल आनंदा पाटील (४८) असे मयताचे नाव असून मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील (वय ६१, रा. पिचर्डे, ता. भडगाव) याच्या विरुद्ध भडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. मयत विठ्ठल यांची पत्नी रेखाबाई यांनी भडगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्या फिर्यादीनुसार अभिमन आनंदा पाटील हे शेतजमिनीचा हिस्सा पालट करून द्या, असे भाऊ विठ्ठल यास वारंवार सांगत होते. तेव्हा विठ्ठल यांनी वडिलोपार्जित जमिनी ज्याच्या त्याच्या नावावर करून देण्याचे वारंवार सांगितले होते. याचा राग मनात ठेवून अभिमन याने विठ्ठल पाटील यांना ठार केले.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, एपीआय, चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, एएसआय, अनिल अहिरे, पोहेकों. मुकुंद पाटील, पोकॉ. महेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपीस खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.