मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्रीय परिवनह मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पूर आणि त्यापासून होणारी हानी टाळण्यासाठी नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर राज्यात स्टेट वॉटर ग्रीड तयार करण्याची सूचना केली आहे. तसेच राज्यात दरवर्षी पूर येतो. दरवर्षी दुष्काळ पडतो. त्यामुळे नियोजन करून हे पुराचं पाणी वळवा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा पत्रं लिहिलं आहे. आधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून वाहून जाणाऱ्या पाण्यातून सिंचनाची कामे हाती घेण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून राज्यात नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर स्टेट वॉटर ग्रीड तयार करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात दरवर्षी महापूर येतो. त्यापासून मोठी हानी होते. ही हानी टाळण्यासाठी राज्यात नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर स्टेट वॉटर ग्रीड तयार करता येऊ शकतं. स्टेट वॉटर ग्रीड करून पुराचं पाणी एका नदीतून दुसऱ्या नदीत वळवा आणि हे पाणी दुष्काळी भागात आणा. अशा प्रकारचं स्टेट वॉटर ग्रीड अस्तित्वात आलं तर सिंचन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील, असं गडकरी यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसेच या वॉटर ग्रीडचा डीपीआरही तयार करण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलं आहे. पूर स्थितीमुळं दरवर्षी मुंबईमध्ये जीवितहानी, वित्तहानी, इमारतींची पडझड, रस्त्यांचे नुकसान होते. मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं होतं. मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असा सल्ला देखील नितीन गडकरींनी दिला आहे. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात यावा , असेही त्यांनी सूचवले होते.
पुराची समस्या सोडवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य नियोजनपूर्वक पुराचे पाणी, ड्रेनेज, गडरलाईनचे पाणी ठाण्याकडे वळवून धरणात साठवता येईल. तिथे पाण्यावर प्रक्रिय करून नाशिक आणि अहमदनगर मधील शेतीला पाणी देता येईल, असेही गडकरींनी सुचवले आहे. पुराचे पाणी दुष्काळी भागात देखील वळवता येईल, असेही त्यांनी म्हटले होते.