डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मिशन साहसी उपक्रमांतर्गत मुलींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण
जळगाव (प्रतिनिधी) : – दृष्टांचा संहार करण्यासाठी देवींना युद्ध करावे लागायचे, त्यामुळे या नवरात्रोत्सवात आपण स्व संरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन निर्धास्तपणे आधुनिक जगात वावरुया.. कारण आज नोकरदार स्त्रीया किंवा मुली ह्या ‘सातच्या आत घरात’ येवू शकत नाही त्यामुळे समाजात वावरतांना सुरक्षित राहण्यासाठी मानसिकतेसह शारिरीकदृष्ट्याही सक्षम व्हावे, स्मार्ट टेक्निकचा वापर करा कारण शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी केले.
निमित्त होते ‘मिशन साहसी’ या कार्यक्रमाचे… गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, होमिओपॅथी, फिजीओथेरपी महाविद्यालय व मेडिव्हीजन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ‘मिशन साहसी – मेकिंग ऑफ द फिअरलेस’ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ.केतकी पाटील ह्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, सिनेट सदस्य स्वप्नाली काळे, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारे राजेंद्र जंजाळे, प्राजक्ता सोनवणे ह्यांची प्रमुख उपस्थीती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्याहस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेडिव्हीजनचे प्रदेश सहसंयोजक व जनरल सेक्रेटरी वरुणराज नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विद्यार्थीनींनी ‘हम फूल नही चिंगारी है, हम भारत की नारी है’ अशा घोषणा दिल्यात.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे ह्यांनी विद्यार्थींना सांगितले की, सुरक्षितता असो वा अन्य कुठलेही तुमच्याशी निगडीत प्रश्न हे सोडविण्यासाठी तुम्ही मतदान करणे गरजेचे आहे. तरुण मतदार सक्रीय झाले की, परिस्थीती नक्कीच बदलते. त्यामुळे आपला मतदानाचा हक्क नक्कीच बजवायला हवा असे आवाहनही मोरे ह्यांनी केले. यानंतर सिनेट सदस्य स्वप्नाली काळे ह्या म्हणाल्या की, अबला म्हणून नव्हे तर सबल म्हणून जगा, साहसी व आत्मनिर्भर बना, हल्ला होत असतांना इतर मदत मिळण्यापर्यंत हल्ला रोखून धरण्याचा प्रयत्न करा, अशा विविध टिप्स काळे यांनी दिल्यात. तसेच प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी देखील हल्ल्यावर प्रतिकार करण्यासाठी आवश्यक युक्त्या सांगितल्यात. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन चेतन माळी, राजनंदिनी पाटील ह्यांनी तर वरुण जोशी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेडिव्हजनचे शौणक चिनामवार, श्रेया स्वामी, ललित सोनार, प्रांशु भाला, आयुषी चव्हाण, वेदिका वाणी, वरुणराज नन्नवरे, चेतन माळी, वरुण जोशी, राजनंदिनी पाटील आदिंनी परिश्रम घेतले.
स्व संरक्षणाचे दिले धडे
प्रशिक्षणादरम्यान अगदी हस्तांदोलन (शेकहॅण्ड) करतांना होणारा वाईट हेतुने केलेला स्पर्श, तिकीट वा अन्य कुठलीही वस्तु कोणी हातात देतांना केलेला वाईट स्पर्शाला प्रतिकार कसा करायचा किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी छेडखानीच्या घटनेचा सामोरा कसा करावा, चाकूहल्ला वा अन्य कुठलेही हल्ल्यादरम्यान स्व सरंक्षण कसे करावे हे सर्व प्रात्याक्षिकाद्वारे विद्यार्थीनींना पटवून देण्यात आले. याप्रसंगी सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींची उपस्थीती होती.