जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेत सीईओ करनवाल यांची माहिती



जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालिका स्नेही पंचायत जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात बालिका पंचायत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. २२ मे रोजी जिल्ह्यातील सरपंच यांची कार्यशाळा शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी या उपक्रमाची माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी सांगितले कि, या उपक्रमात ११ ते २१ वयोगटातील मुली सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत ५ मुलींची ‘बालिका पंचायत’ स्थापन करण्यात येऊ शकते. त्यातील एकीला सरपंच आणि दुसरीला सचिव म्हणून निवडण्यात यावे. या बालिका पंचायतीच्या माध्यमातून बालविवाह, हुंडा प्रथा, मद्यपान यांसारख्या सामाजिक समस्यांवर जनजागृती करणे, मुलींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या विषयांवर काम करणे . हे या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहेत. या उपक्रमातून मुलींना ग्रामपंचायतींसाठी ठराव सुचवण्याची संधी देण्यात आली. या ठरावांवर आधारित ग्रामपंचायतींनी कृती केली तर त्या बालिका पंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत .
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार हे ग्रामपंचायतीला दिले जाणार असून सर्वोत्तम बालिका पंचायत’ म्हणून ग्रामपंचायतीना गौरविण्यात येणार आहे. हा उपक्रम मुलींना नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देतो, ज्यामुळे त्या भविष्यात सक्षम नागरिक आणि नेते बनू शकतात.असेही त्यांनी यावेळी सांगितले. करनवाल यांनी यावेळी उपस्थित सरपंचांमध्ये थेट मिसळत त्यांचेशी संवाद साधला. त्या सोबतच ग्रामपंचायती मध्ये मुलींच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. ग्राम पंचायतीनी या उपक्रमात मोठया प्रमाणात सहभागी होऊन विविध उपक्रम राबविण्याबाबत देखील मार्गदर्शन केले. यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थी यांना करनवाल यांचे हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.