मुक्ताईनगर तालुक्यात यात्रेत घडला होता प्रकार
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथेही संत मुक्ताई यात्रोत्सवात दोन मुलींच्या छेडखानी प्रकरणात आज रविवारी दि. २ मार्च रोजी ७ जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान एका १८ वर्षीय युवतीसह तिच्या मैत्रिणींना छेडछाडीचा सामना करावा लागला. यातील पहिली घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉलजवळ घडली. या ठिकाणी संशयित आरोपी अनिकेत भोई याने या मुलींकडे पाहून अश्लील हातवारे केले. यानंतर दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता या मुली यात्रेत फिरत असतांना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई याच्यासह पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रीणींचा पाठलाग करून त्यांच्या सोबत लज्जास्पद कृत्य करत विनयभंग केला.
तसेच त्यांनी या मुलींचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर १८ आणि १६ वर्षे वयाच्या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे (सर्व रा. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वांच्या विरोधात भारतीय न्याय संहितासह लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८ आणि १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते व सहायक पोलीस निरिक्षक जयेश पाटील हे करत आहेत.