अमळनेर (प्रतिनिधी) : शाळा, क्लासेस सुटल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या १२ टवाळखोर मुलांवर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी धडक कारवाई केली आहे.
शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर काही टवाळखोर मुले डी आर कन्या शाळा तसेच शिकवणी वर्ग सुटल्यावर घोळका करून उभे राहून मुलींची टिंगल टवाळी करणे, नाव घेणे, अश्लील इशारे करणे आदी गैरप्रकार करत होते. काल एकाने कन्या शाळेजवळ एका मुलीचा हात धरण्याचे धाडस केले. याबाबत अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी स्वतः सह हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, संदेश पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे, जितेंद्र निकुंभे, मंगल भोई, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांनी साध्या वेशात डी आर कन्या शाळेजवळ सापळा रचला.
साध्या वेशात पोलीस असल्याने टारगट मुलांना ते ओळखले गेले नाहीत. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर मुलांनी आपला छेड काढणे सुरू केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. कारवाईचा पहिलाच दिवस असल्याने त्या टारगट मुलांना पोलिसी खाक्या दाखवून सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. या कार्यामुळे पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.