जळगावातील शिरसोली रस्त्यावरील घटना
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणाने घडला प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यलयातील विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी बेदम चोप दिला. तसेच, संतप्त तरुणांनी रिक्षाची प्रचंड तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रिक्षाचालकाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.
रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली प्रवेशित आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून मुला – मुलिचे बस अभावी मोठे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे. एसटी बस देखील थांबत नाही. याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत काही दिवसांपासून तो मुलींचे फोटो काढत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज काही तरुणांना माहिती मिळताच त्यांनी या रिक्षाचालकांचा मोबाईल तपासला. त्यात त्यांना आणखी काही मुलींचे फोटो दिसले.
यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी त्याला चोप दिला. तसेच, त्याच्या रिक्षाची प्रचंड तोडफोड करून ती महाविद्यालयासमोरच उलटून दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यांनी रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.