नाशिक विभागाचे निकाल जाहीर : रावेर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, पशुधन विभागाचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचा डंका वाजला असून राज्य शासनाने नाशिक विभागातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना गौरविले आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्हा परिषदेतील उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागात जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गात द्वितीय स्थानी पशुधन विकास अधिकारी विवरे ता.रावेर तर तालुका वैद्यकीय अधिकारी या संवर्गात तृतीय क्रमांक तालुका वैद्यकीय अधिकारी, रावेर या कार्यालयानी पटकावला आहे.
१०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्या बाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा,स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना करणेबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर या तिन्ही कार्यालयांचा क्रमांक आला आहे. या तिन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अभिनंदन केले आहे.