पोलिसांकडून संशयिताला अटक
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरात सुमारे २ लाख १७ हजार रूपये मूल्य असणारा गांजा जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनने याप्रकरणी एकाला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
कुऱ्हा येथील रहिवासी नसीर शहा रऊफ शहा हा इसम गांज्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती ही मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीला देण्यात आली. या अनुषंगाने एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून कारवाई केली. या पथकाने नसीर शहा रऊफ शहा याच्यावर छापा टाकून त्याला अटक केली. यात नसिर शहा याच्याकडे सुमारे १३. ५१ किलो वजनाचा व २ लाख ७१ हजार ४०० रूपयांचे मूल्य असणारा गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे नसीर शहा याला अटक करण्यात आली असून एलसीबीचे कर्मचारी संघपाल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.