वैष्णोदेवी दर्शनाला गेले असताना डोंगरकडा घसरल्याची आपत्ती
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर तालुक्यातील उंबरा, पारंबी, मुर्झिरा व तालखेडा येथील ४२ यात्रेकरू दि. २२ ऑगस्ट रोजी रेल्वेने जम्मू-कश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. कटरा येथे पोहोचून दर्शन घेत असतानाच जोरदार पावसामुळे डोंगरकडा घसरल्याने हे सर्व यात्रेकरू अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.
सर्व यात्रेकरु हे सुरक्षित असून दोन यात्रेकरू वरच्या भागात अडकले आहेत. ते देखील सुरक्षितपणे खाली आल्यानंतर सर्व यात्रेकरु परतीचा प्रवास सुरू करणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच गावातील व्यक्ती यात्रेकरूंशी सतत संपर्कात आहेत. सर्वजण सुरक्षित असल्याचे निश्चित झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यामुळे लवकरच सर्व यात्रेकरुन सुरक्षितपणे आपआपल्या घरी पोहचतील असे सांगण्यात आले आहे.