आ. किशोर पाटील यांनी केले अभिनंदन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या पुढाकाराने आणि शासनाच्या प्रेरणेतून यंदा “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या टप्पा क्रमांक-२ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाचोरा तालुक्यातील होळ येथील प्राथमिक शाळा आणि भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील माध्यमिक शाळा यांनी या स्पर्धेत आपली गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णता सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला. दोघीही शाळा आ. किशोर पाटील यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी भाषणातून त्यांचा गौरव करत सर्व संबंधितांचे विशेष अभिनंदन केले.
आ. किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातल्या शाळांनी शिक्षणाच्या दर्जामध्ये आणि उपक्रमशीलतेमध्ये घेतलेली झेप ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यश मिळविण्यासाठी या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्यामुळेच या शाळांनी जिल्हास्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले. आमदार पाटील यांनी सांगितले की, “शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास हा केवळ बांधकामांपुरता मर्यादित नसून, त्यामध्ये मूल्यशिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवोपक्रमांची अंमलबजावणी आणि पालक-शाळा समन्वय हे घटकसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. या दोन्ही शाळांनी ते दाखवून दिले आहे.”
समारंभात उपस्थित मंत्री संजय सावकारे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या दोन्ही शाळांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाच्या व्हिडिओंमध्ये शाळांची अंतर्गत स्वच्छता, रंगरंगोटी, परिसर सौंदर्यीकरण, डिजिटल साक्षरता, मुलांना दिले जाणारे मूल्यशिक्षण, शालेय उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच पालक व ग्रामस्थांच्या सहभागाने झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ स्पर्धात्मकतेचा नव्हता, तर प्रत्येक शाळेला स्वतःच्या विकासाचा विचार करायला प्रवृत्त करणे हा होता, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
होळ येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या शिक्षकवृंदांनी अत्यंत जिद्द, चिकाटी व नवकल्पनांचा वापर करत शाळेला फक्त स्वच्छ व सुंदरच नव्हे तर एक आदर्श शाळा म्हणून घडवले आहे. त्याचप्रमाणे, तांदूळवाडी येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सर्जनशील व्हिडिओ सादरीकरणाद्वारे नवोपक्रमाच्या बाबतीत आपले वर्चस्व दाखवले. दोन्ही शाळांनी केवळ शासकीय निकष पूर्ण केले नाहीत, तर त्याहीपलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश दिला.