धुळे जिल्ह्यातील घटना
धुळे (प्रतिनिधी) : शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमानिमित्त खर्चापोटी रुपये एक हजाराची लाच घेताना आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला धुळे एसीबीने रंगेहाथ पकडुन अटक केली. सदरची घटना ही मंगळवारी दि. १९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्रदीप पुंडलिक परदेशी (वय ५५ वर्ष, रा.कुसुंबा, ता.धुळे) असे आहे. तक्रारदार महिला या सोशल ऍण्ड कल्चरल असोशिअशन कुसुंबा, ता.जि. धुळे संचलित आदर्श हायस्कूलमध्ये महिला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी शाळेतील सर्व कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमापोटी १ हजार व कर्मचाऱ्यांकडून ८०० रुपये अशी मागणी केली. तक्रारदार शिक्षिकेने यास विरोध केल्याने त्यांना हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी प्रतिबंध केला.
तक्रारदार महिला शिक्षिका हिने या बाबत धुळे एसीबी कडे तक्रार दाखल केल्याने आज मंगळवार दि .१९ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी याना त्यांच्याच दालनात रुपये एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडुन अटक करण्यात आली. या बाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई धुळे लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरिक्षक हेमंत बेंडाले, मंतिजसिंग चव्हाण, एपीआय रुपाली खांडवी,राजन कदम, मकरंद पाटील, बागुल आदींनी केली.