मुंबई ( वृत्तसंस्था ) – रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अधिकृत स्पष्टीकरण देत “मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा इतरत्र कुठेही स्थलांतरीत होणार नाहीत. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे हा आहे”, असं सांगण्यात आलं आहे.
“रिलायन्स ग्रुपच्या वेगाने वाढणाऱ्या व्यवसायामध्ये या मालमत्तेचं अधिग्रहण ही एक जमेची बाजू असेल. भारतातील प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा जागतिक स्तरावर विस्तार यामुळे साध्य होऊ शकेल”, असं देखील रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील घराची दोन दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. मुकेश अंबानींचं मुंबईतील अँटिलिया हाऊस अजूनही चर्चेचा विषय असताना आता त्यांच्या लंडनमधील घराचीही चर्चा सुरू झाली आहे. बकिंगहॅमशायरमध्ये त्यांनी ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून तिथल्या आलिशान घरात मुकेश अंबानी शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
अंबानी लवकरच सहकुटुंब लंडनला वास्तव्यास जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. बकिंगहॅमशायरमघील स्टोक पार्क या ठिकाणी ही मालमत्ता असून या घरात तब्बल ४९ बेडरुम आहे. या घरात अत्याधुनिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानींनी लंडनमध्ये ५९२ कोटींना ही मालमत्ता खरेदी केली आहे.