अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : मुदत संपलेल्या खतांच्या ४० बॅग विक्री झाल्याचा प्रकार तालुक्यातील शिरूड येथे शुक्रवारी दिनांक २६ जुलै रोजी उघडकीस आला आहे. या खतांचे नमुने घेऊन ते नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शिरूड गावातील शेतकऱ्यांनी कृषी उपविभागाकडे गावात बोगस खतविक्री झाल्याची तक्रार २५ रोजी केली होती.
त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पंचायत समिती कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर व कृषी सहायक सुभाष पाटील आदींच्या पथकाने शुक्रवारी शिरूड येथील मुकेश देवीदास पवार यांच्या मालकीच्या गुरुदेव दत्त कृषी सेवा केंद्रावर जाऊन स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. त्यात खतांच्या ४० बॅग विक्री झाल्याचे आढळले. या बॅगांची तपासणी केली असता खतांची मुदत संपलेली आढळली. मात्र, त्यावर मार्करने रेष मारून मुदत वाढवलेली आढळली. कायद्याने हे मुदत संपलेले खत विक्री करता येत नाही. सदर खतांचे नमुने नाशिक येथील खत परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या वेळी किशोर पाटील, भालेराव पाटील, वसंत पाटील, दीपक पाटील, हरिचंद्र पाटील, गोपाल महाराज, नानासाहेब पाटील हे तक्रारदार शेतकरी व कंपनी प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त पंचनामा करुन त्याची प्रत तक्रारदारांकडे सोपवली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.