भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेल्हाळे येथील राख वाहणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबल्या गेल्याने अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवार दि. १७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
विशाल तारसिंग भिलाला (वय १६, रा. मध्य प्रदेश, ह.मु. वेल्हाळे ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो परिवारासह राहत होता. मजुरी काम करून परिवार उदरनिर्वाह करीत होता. औष्णीक विज केंद्रातून कोळशीची जळालेली राख व वेलहाळे बंडात जमा झालेली राख विट भट्टी व इतर कामासाठी वापरली जात असल्याने राखेची मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर व इतर वाहनाने वाहतूक केली जाते. बंडात जाणारा रस्ता मोठा जिकरीचा असल्याने वाहन चालकांना त्या रस्त्यावर चांगलीच कसरत करून राखेची वाहतूक करावी लागते. अशा जीवघेण्या रस्त्यावर मध्यप्रदेश येथुन मजुरीसाठी आलेला विशाल भिलाला १६ वर्षाचा तरुण मयत झाला आहे.
विशाल हा दि. १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान टॅक्ट्रर घेऊन राख भरण्यासाठी जात असताना अचानक टॅक्ट्ररसह ट्रॉली उलथल्याने विशाल त्या खाली दाबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याला वरणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहा. पो. निरिक्षक श्रावण जवरे हे करीत आहे.