पाचोरा-माहेजी दरम्यान घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने मध्य प्रदेशातील प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-माहेजी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा ते माहेजी रेल्वेस्थानक खंबा क्र.३८४/७ ते ९ दरम्यान दिनांक ११ जुलै रोजी डाऊन रेल्वे लाइनजवळ एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडून असल्याची माहिती लोकोपायलट डी. एस. बोढरे यांनी वॉकिटॉकीवरून उपस्टेशन प्रबंधक पाचोरा यांना दिली. उपस्टेशन प्रबंधक यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला सदरील घटनेची माहिती दिली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शव ताब्यात घेऊन अॅम्बुलन्सद्वारा पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले.
अनोळखी मयत प्रवाशाजवळ पोलिसांना मोबाइल मिळून आल्याने त्यांनी त्यातील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मयताचे नाव अन्नू हरिलाल कोल (वय- ३१, रा. सतना, मध्य प्रदेश) असे असून मनमाड ते सतना प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विकास खैरे हे करीत आहेत.