नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाचं नाक सडायला सुरुवात झाली आहे. मंकीपॉक्सची ही अत्यंत भयावह अशी केस ठरली असून हा रुग्ण ४० वर्षांचा असून तो मूळचा जर्मनीचा रहिवासी आहे.
ब्रायनला (बदललेले नाव) एके दिवशी नाकावर लाल रंगाचा डाग दिसला होता. त्याने डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी काळजी करण्याचं कारण नसून तुला फक्त सनबर्न (सुर्यामुळे त्वचा भाजणे) झाला असल्याचं सांगितले होते . मात्र त्यानंतर ब्रायनच्या नाकावरील हा लाल डाग वाढायला लागला आणि तो काळा व्हायला लागला होता. हळूहळू ब्रायनच्या अंगावर फोड यायला लागले. खासकरून त्याच्या तोंडावर आणि गुप्तांगावर फोड आले होते. अंगावर फोड दिसताच ब्रायनने चाचणी करून घेतली होती. यामध्ये त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं निष्पन्न झाले.
ब्रायनवर औषधोपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळी त्याची एचआयव्हीची आणि गुप्तरोगाचीही चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या. ब्रायनने डॉक्टरांना सांगितलं की त्याने एचआयव्ही आणि गुप्तरोगासाठीची चाचणी आयुष्यात पहिल्यांदा केली होती. डॉक्टरांनी ब्रायनवर अधिक चाचण्या केल्या असता ब्रायनला एडस झाल्याचंही डॉक्टरांना दिसून आलं. या सगळ्या आजार आणि रोगांमुळे ब्रायनच्या शरीरावर फोड आले होते आणि त्यात पू साठला होता. इतकंच नाही तर त्याच्या नाकाचा शेंडाही सडण्यास सुरूवात झाली आहे.