पाचोरा शहरातील धक्कादायक घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील पुजारी नगरमधील वयोवृद्धाचा मोकाट गाईंच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बाळू विठ्ठल पवार (वय ८५) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. महेश झेरॉक्सचे संचालक ऍड. महेश बाळू पवार यांचे ते वडील होते.
शहरातील भडगांव रोडवरील पाण्याच्या टाकी मागील घरासमोर खुल्या जागेवर सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शतपावली ते करत होते. तेव्हा मोकाट सुटलेल्या तीन गाईनीं त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. घरातील मंडळींनी आरडा-ओरड करताच परिसरातील नागरिक धावत आले अन वृद्ध बाळू पवार यांची या गाईंपासून सुटका केली.
तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही तासातच उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. नगरपालिकेने मोकाट सोडलेल्या गायींनवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे.