प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : – आरटीई म्हणजेच मोफत शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांनी खोटी व चुकीची माहिती, चुकीचा पत्ता सादर करून, जेथे प्रत्यक्षात राहत नाहीत त्या ठिकाणाचा पत्ता सादर करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि कागदपत्र पडताळणीत, पत्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर तालुकास्तरीय निवड समितीच्या अशी बाब निदर्शनास आल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येईल व पालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे.
वंचित व दुर्बल घटकातील अर्ज केलेल्या बालकांसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर निवड झालेल्या बालकांच्या नावाची निवड यादी दि.१४ रोजी शासनामार्फत प्रसिद्ध झालेली आहे. निवड झालेल्या बालकांच्या आई अथवा वडिलांच्या / पालकांचे त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तसे मेसेज देण्यात आलेले आहेत. ऑनलाइन लॉटरी प्रक्रियेद्वारे या बालकांची निवड झालेली आहे. पालकांनी दिलेला अर्जातील पत्ता, गुगल पत्ता, लोकेशन, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि भाडेकरार या बाबींची कागदपत्र तसेच आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन पडताळणी केली जाणार आहे.
२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील लॉटरी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राज्यस्तरावरून राबविण्यात येत असल्याने पालकांना त्यांच्या बालकांच्या प्रवेशाबाबत कोणतेही प्रलोभन कोणीही दिलेले असल्यास त्यास बळी न पडण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे. तसेच जे योग्य व खरी कागदपत्रे आहेत तीच तालुकास्तरीय निवड समितीकडे सादर करावीत, कोणतीही चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत किंवा तालुकास्तरीय निवड समितीची दिशाभूल करू नये, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेले आहे.