महिला गंभीर जखमी, अमळनेर शहरातील घटनेत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : मोबाईलवरील मोफत खेळासाठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून संतापलेल्या भाच्याने डोक्यात सांडशी मारून गंभीर जखमी झाल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजता घडली. अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हलीमा बी अब्दुल रशीद (वय ५०, रा. ख्वाजा नगर, रेल्वे टाकी फाईल, अमळनेर) या जखमी झाल्या आहेत. घरी असताना हलीमाबी यांचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे, मला पैसे लागणार आहेत पैसे दे. नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे नाही असे हलीमाबी यांनी सांगताच सकलैन याने संतापून सांडशीने तिच्या डोक्यात मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हालिमाबी यांच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
चक्कर येत असल्याने पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला सकलैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील फ्री फायर गेम साठी पैसे मागत असल्याचे सांगितले. गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.









