रेल्वे सुरक्षा दलासह जिल्हापेठ पोलीसांची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरी करणाऱ्या एका मालेगाव येथील चोरट्यांला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र, त्याचा मालेगाव येथील साथीदार सोनू हा पळून जाण्यात यशस्वी झाला. जिल्हापेठ पोलिसांनी रेल्वे पोलीस दलाच्या सहकार्याने ही कामगिरी केली.
शेख इम्रान शेख गुफरान (वय २२, रा. गुलशन नगर, मालेगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी नवीन बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना पोहेकॉ नरेश सोनवणे, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, पोकॉ राहुल पाटील आणि नरेंद्र दिवेकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार, हे पथक बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना, दोन संशयितांनी पोलिसांना पाहून पळ काढला.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत, रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने शेख इम्रान शेख गुफरान याला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पकडले. त्याच्याकडे सापडलेल्या ४ मोबाईलबाबत चौकशी केली असता, त्याने पळून गेलेला त्याचा साथीदार सोनू याच्यासोबत बसस्थानकातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली.