बहुजन महापौरांची होणारी मुस्कटदाबी थांबणार तरी केव्हा ?
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेला आता अठरा वर्ष झाली आहेत. अठरा वर्षांमध्ये ज्या बहुजन महापौरांनी विकास कामे करण्यासाठी पुढाकार घेतला तसेच जळगावचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला अशा महापौरांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील अंतर्गत विरोध करून विकासकामांच्या मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आताही हे चित्र विद्यमान महापौर जयश्री महाजन यांच्या काळात दिसून येत आहे.
जळगाव शहरामध्ये जी सतरा मजली इमारत दिमाखाने उभी आहे ती इमारत महानगरपालिकेची आहे, असे आपण जरी सांगत असू तरी शहरात अपेक्षित विकास कामे आजवर झालेली नाहीत. सतरा मजली इमारत बांधणे म्हणजे विकास नाही. ही विकास कामे करण्यासाठी अनेक महापौरांनी प्रयत्न केले. त्यात बहुजन महापौरांनी स्वतःहून काहीतरी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून पाहिला. त्यावर सर्वसमावेशक चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंमलबजावणीसाठी स्वकीय नगरसेवक यासह विरोधी गटातील नगरसेवक देखील त्या विकास कामाच्या विरोधात उभे ठाकले. त्यामुळे पूर्णपणे विकास कामे आपल्याला आजही शहरात दिसत नाही.
महापालिकेत विकास कामांना अग्रेसर असणारे बहुजन महापौर आशाताई कोल्हे, विष्णू भंगाळे, किशोर पाटील, ललित कोल्हे, सीमा भोळे, राखीताई सोनवणे, भारती सोनवणे, जयश्री महाजन हे सर्व उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षित असतानासुद्धा त्यांचा अभ्यासूपणा, काम करण्याची वृत्ती ही वाखाणण्याजोगी होती. या बहुजन महापौरांना जर वेळीच नगरसेवकांचा त्या त्या वेळेला पाठिंबा मिळाला असता तर विकास कामे गतीने पुढे गेले असती. बहुजन महापौरांच्या मुस्कटदाबीला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. १८ वर्षे झाली बहुजन महापौरांना पक्षातीलच नगरसेवकांचा विरोध झेलावा लागला आहे. विकासाचा दृष्टिकोन असायला हवा. त्यावर सर्वंकष चर्चा झालीच पाहिजे. मात्र बहुजन महापौरांच्या वेळेला अंतर्गत नाराजीमुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रकार स्वपक्षासह इतर विरोधी पक्षाच्या लोकांकडूनही होत आहे. बहुजन समाजाच्या महापौरांना पुढे जाऊ देण्यासाठी कुठल्याही प्रकारची इच्छाशक्ती दिसून आलेली नाही.