जळगाव पोलीस दलाची कामगिरी, पावणे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तब्बल ८ घरफोड्यांची उकल केली. यामध्ये ५ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० तोळे सोने, ६५० ग्रॅम चांदी आणि एलईडी टीव्ही असा एकूण ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील दोन चोरटे हे फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी दिली.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. (केसीएन)गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कळले की, संशयित सागर शिवराम डोईफोडे आणि त्याचे साथीदार हे महाबळ परिसरात झालेल्या घरफोड्यांमध्ये सामील आहेत. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्याने ६ घरफोड्यांची कबुली दिली. सागर डोईफोडे आणि त्याच्या साथीदारांनी रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करण्याची रणनीती अवलंबली होती. खिडक्या तोडून घरात प्रवेश करत आणि मौल्यवान वस्तू लंपास करत असत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या वस्तूंपैकी १० तोळे सोने आणि ६५० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे.
सागर डोईफोडेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नितेश मिलिंद जाधव, दीपक विनोद आढाळे, रवी भागवत सोनवणे आणि अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे यांना अटक केली. या संशयित आरोपींनी दोन घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एलईडी टीव्ही आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यशस्वी कारवाईसाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय सपकाळे, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, इरफान मलिक, पोलीस नाईक हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, विनोद सूर्यवंशी, पोलीस शिपाई रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करत आहेत.