भुसावळ (प्रतिनिधी) : धर्मवीर मीना यांनी दि. १ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते १९८८ परीक्षेच्या बॅचमधील इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनिअर्सचे अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता म्हणून कार्यरत होते. दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त झालेल्या राम करन यादव यांचे ते उत्तराधिकारी आहेत.
धर्मवीर मीना यांनी एम. बी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, जोधपूर येथून १९८८ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.ई. केले असून त्यांनी कायद्याची पदवी देखील घेतली आहे. ते मार्च १९९० मध्ये रेल्वे मध्ये रुजू झाले. त्यांनी दक्षिण पूर्व रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेत क्षेत्रिय आणि मुख्यालय या दोन्ही ठिकाणी विविध भूमिका बजावल्या आहेत. सिग्नलिंग प्रकल्प आणि मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांशी संबंधित सिग्नलिंग कामे, संरक्षितता कामे विक्रमी वेळेत पूर्ण करणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या विविध कार्यकाळांमध्ये त्यांनी प्रवासी सुविधांवर विशेष लक्ष पुरविले. प्रवाशांच्या सोयीकरिता आणि त्यांच्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवण्याकरिता आणि वाढवण्याकरिता त्यांनी विविध माध्यमांचा यशस्वीरित्या उपयोग केला. पश्चिम रेल्वेवर उपमुख्य दक्षता अधिकारी या नात्याने २००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी रेल्वेमध्ये उत्पादकता, सचोटी आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी दक्षतेचा एक सुधारात्मक आणि रचनात्मक साधन म्हणून वापरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दक्षता प्रणाली सॉफ्टवेअर लागू केले. या प्रयत्नांचे कौतुक म्हणून त्यांना २०१३ मध्ये माननीय रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे योगदान उच्च संरक्षा मानके आणि प्रगत, स्वदेशी विकसित तांत्रिक प्रणालींसह वाहतुकीत भारतीय रेल्वेला जागतिक नेतृत्व म्हणून स्थान देण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.