जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात झालेल्या रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय गृहस्थाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. कैलास श्रीपंत जाधव (वय ६०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे पावणेनऊ वाजेच्या सुमारास कैलास जाधव हे एमआयडीसी परिसरातून आपल्या कामानिमित्त जात होते. काशिनाथ चौकाजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ मदत करत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.









