आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर प्रथम ‘मी कोण आहे?’ हे जाणून घ्या. तुमचे स्वरुप तुम्हाला ओळखता आले तर सोपे जाईल. या पूर्वी जितके आत्मा सिद्ध, बुद्ध आणि मुक्त झाले किंवा वर्तमान काळातील आत्मा सिद्ध, बुद्ध आणि मुक्त होतील त्यांनी मी कोण आहे याचे उत्तर शोधले त्यामुळे ते त्या पदापर्यंत पोहोचले. परंतु आजचा मानव मात्र मी कोण आहे हे सांगण्यातच आपल्या अनमोल वेळ खर्ची घालताना दिसत आहेत हे वास्तव आहे. मी कोण आहे हे जाणण्याचा पुरुषार्थ करावा असे शासनदीपक प.पु. सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांना सांगितले.
या विषयी विवेचन करताना एका साधुचे व नगरातील शेठ पुत्राची गोष्ट त्यांनी सांगितली. गर्दीतून वाट काढताना नगरशेठच्या मुलाला साधुचा धक्का लागतो. आपल्याला साधुचा धक्का लागला या बाबीचे त्याला वाईट वाटले. अहंकाराने त्या साधुंना तो म्हणाला तुम्ही कुणाला धक्का दिला, मी कोण आहे ठाऊक आहे का? त्या साधुजींनी त्याच्या सर्व पूर्वजन्माबाबत कल्पना दिली. तुला आज विपुल पुण्यपुंजी खर्च केल्याने मनुष्य जन्म मिळाला आहे. तुम्ही त्या पुंजीचा गर्व करतात परंतु ती पुंजीच तुम्हाला दुर्गतीत नेणारी ठरते. पद, प्रतिष्ठा, रुबाब, डिग्री, मान-मतराब, सौदर्य, संपत्ती या गोष्टी इथेच राहणाऱ्या आहेत. आपले बरे किंवा वाईट कर्मच आपल्यासोबत येते त्यामुळे चांगले कर्म कसे होतील याबाबतचे चिंतन करायला हवे.
प.पु. ऋजुप्रज्ञजी म.सा यांनी देखील ठाणांग सुत्रच्या अध्यायात सांगण्यात आलेल्या मृत्यू किंवा मरणाच्या प्रकारावर चर्चा केली. मुख्य तीन प्रकारच्या मरणाबाबत सांगताना बाल मरण, बाल पंडीत मरण आणि पंडीत मरण यांच्या संकल्पना समजावून सांगितल्या. भोगांमध्ये जीवन व्यर्थ घालविण्यापेक्षा आपल्याला मुक्त कसे होता येईल त्या दृष्टीने प्रयत्नशील रहावे असे आवाहन उपस्थितांना केले गेले.