हजारो श्रद्धाळूंनी घेतले चांगदेवासह शिवशंभूचे दर्शन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतीनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे श्री संत मुक्ताईच्या यात्रेनंतर महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांची मोठी यात्रा भरते. एकादशीच्या आदल्या दिवसापासून अनेक दिंड्या दाखल झाल्या. बुधवारी संध्याकाळपर्यंत लहान-मोठ्या दिंड्या चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी येतच होत्या. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त महाशिवरात्रीला डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सर्व गुरव पुजारी परिवाराच्या हस्ते अभिषेक झाला. निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये दीपक पाटील (भुसावळ) यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. तापी पूर्णाच्या संगमावर अफाट
जलसागरात भाविक संगम दर्शनासाठी नौकाविहाराचा आनंद घेत होते. नावाडी संघटनेतर्फे बोटी तयार ठेवण्यात आल्या होत्या. दिवसभर नौकाविहार चालू होता. पाण्यामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनातर्फे संरक्षणाच्या दृष्टीने बोटी तयार ठेवण्यात आल्या होत्या. पहाटेपासून भाविकांनी महाशिवरात्रीच्या पर्वावर तापी पूर्णाच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेले भाविक चांगदेव महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परतीचा मार्ग धरत नाहीत. बुधवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुक्कामी असलेले वारकरी संप्रदायाचे भाविक हर हर महादेवचा गजर करीत चांगदेव महाराजांचे दर्शन घेत होते. भाविकांना जागोजागी फराळ, दूध, केळी यांचे वाटप केले जात होती. मानेगाव रस्त्याला मानेगाव ग्रामस्थांतर्फे फराळ वाटप, दुधाळा मारुती येथे खंडेराव वाडीतर्फे तसेच चांगदेव ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतजवळ आणि निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये दिवसभर फराळ वाटप सुरु होते.