मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची सतर्कतेने दुर्घटना टळली
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेच्या मार्गावर अज्ञात व्यक्तींनी दगड ठेवल्याची बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे.
रेल्वे कर्मचारी वेळोवेळी रुळांची तपासणी करीत असतात. म्हसावद रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रेल्वे कर्मचाऱ्यांना रुळांच्या मधोमध तसेच दोन्ही रुळांवर काही मोठे दगड ठेवलेले दिसले. ही बाब तातडीने नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुळांवरील दगड बाजूला केले. जर वेळीच हे दगड हटवले नसते, तर धावत्या रेल्वेगाड्यांचे मोठे नुकसान झाले असते आणि प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळांवर आणि रुळांमध्ये हे दगड कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याचा तपास आता रेल्वे सुरक्षा दल करत आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली आहे.