जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील मेहरूण भागातील जयभवानी नगर परिसरातून घरासमोर उभी केलेली ५५ हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? यावल येथील रहिवासी आत्माराम सुरतसिंग पाटील (वय ४७) हे कामानिमित्त जळगावात आले होते. त्यांनी आपली लाल आणि काळ्या रंगाची बुलेट (क्र. MH 19 DR 2757) मेहरूणमधील स्मशानभूमी रोडवरील जयभवानी नगर येथे राहणारे मित्र अशोक कुंभार यांच्या घरासमोर उभी केली होती. १४ एप्रिलच्या मध्यरात्री १:३० ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे लक्षात येताच पाटील यांनी परिसरात शोध घेतला, मात्र गाडी मिळून आली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार रमेश चौधरी पुढील तपास करत आहेत.









