मुंबई (वृत्तसंस्था) – भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने गुरुवारी दगड भिरकावला. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यानंतर भाजपधून राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका करण्यात येत आहे.
भाजप महिला नेत्या आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरच खोचक टीका केली आहे. ‘जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू,’ असल्याचा टोला आमदार बोर्डीकर यांनी लगावला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. आम्ही पडळकर यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर पडळकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस आयुक्तालयाबाहेर निषेध नोंदवला.