मुंबई (वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील महिला आणि बालिकांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. राज्यातील जनतेने हा बंद शंभर टक्के यशस्वी करावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात येत आहे.
राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी याबाबत माहिती दिली. बदलापूर, पुणे, अकोला आदी ठिकाणी शाळांमधील लहानग्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. बदलापूर येथील घटना घडलेल्या शाळेचे संचालक रास्व संघ, भाजपचे असल्याने महायुतीच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास अक्षम्य टाळाटाळ केली. याविरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीमार केला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष, एकनाथ शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली.
महायुतीने मुळातच गुन्हेगारीतून राज्याची सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची राजधानी बनवत या महायुतीने आजवर सुसंस्कृत, महिला आणि सर्वसामान्यांचा आदर करणारे राज्य ही महाराष्ट्राची प्रतिमा मातीत घातली आहे, असा आरोप डॉ. नारकर यांनी केला आहे. बेटी बचाव, लाडकी बहीण या घोषणांमागील हे वास्तव आहे. राज्यातील महिलांना खरी गरज महायुती पोसत असलेल्या गुंडांपासून संरक्षणाची आहे. महायुती सरकारच्या महिलाविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद पूर्णतः यशस्वी करण्यासाठी माकपच्या कार्यकर्त्यांनी त्वरित कामाला लागावे. जनतेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.