मंत्री गिरीश महाजन यांचा जोरदार हल्लाबोल
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सनदी महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी रविवारी दि. ६ एप्रिल रोजी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. फालतू बडबड काय करता, एकतरी पुरावा दाखवा. तुमचे दुकान बंद झाले म्हणून आता चरित्रहनन करण्याच्या पातळीवर तुम्ही आले आहेत. माझा अंत बघू नका, खुलासा केला तर खडसे तुम्हाला तोंड काळे करावे लागेल. घरातून बाहेर पडता येणार नाही, अशा शब्दात घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचे महिला अधिकाऱ्यांशी संबंध आहेत अशा आशयाची क्लिप मुंबईतील एका माध्यमाने प्रकाशित केल्यावरून आ. एकनाथराव खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर टीका केली आहे.(केपीएन)तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील गिरीश महाजन यांची खरडपट्टी काढली होती असेही आ. खडसेंनी म्हटले आहे. सकाळी आ. खडसेंची प्रतिक्रिया व्हायरल झाल्यावर आता दुपारी वाशीम जिल्ह्यात पोहरागड येथे एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली. यावेळी ना. महाजन यांनी आ. खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
ते म्हणाले की, आम्ही तोंड उघडले तर त्यांना घराबाहेर निघणे मुश्किल होईल. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे असे आव्हान मी दिले आहे. त्यांचा जावई अडीच वर्षे जेलमध्ये जाऊन आला. त्यांच्या पत्नीला आम्ही नैतिकता व महिला म्हणून जेलमध्ये जाऊ दिले नाही. विनाकारण कमरेखालील भाषा वापरायची हे बरोबर नाही.(केपीएन)माझ्या कामाबद्दल, भ्रष्ट्राचाराबद्दल बोला. त्यांचे दुकान बंद झाले आहे. माझी प्रगती पाहून त्यांचा जळफळाट होत आहे. मी त्यांच्याइतका खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. त्यांना आरोप करता येतात पण ते सिद्ध करता येत नाही. पुरावा दाखवा सक्रिय राजकारणातून मी निवृत्त होईन असेही महाजन म्हणाले. घरातलीच गोष्ट आहे. बोलायला लावू नका, माझा अंत बघू नका, मी खुलासा केला तर खडसे तुम्हाला तोंड काळे करावे लागेल, असेही ते शेवटी म्हणाले.