जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी राज्यात मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण वीजबिलांपैकी ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन पर्याय निवडला आहे. आठ महिन्यांमध्ये ३५ हजार ४५३ कोटी रुपयांच्या (७५.६ टक्के) वीजबिलांचा सुरक्षित ऑनलाइन भरणा केला आहे. नोव्हेंबरमध्ये ४ हजार ६३६ कोटी रुपयांचा (७६ टक्के) भरणा करून ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला आहे.
महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सर्व सेवा डिजिटल उपलब्ध आहेत.लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय आहे. दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच सर्व सेवा लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय आहे.१० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अॅपची सोय आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व सेवा उपलब्ध आहेत. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत १२ हजार ७८९ कोटी ५२ लाख रुपयांच्या (५३ टक्के) वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा केला आहे.
महावितरणच्या २० हजार ८७४ उच्चदाब वीजग्राहकांकडून दरमहा १०० टक्के म्हणजे सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे करण्यात येत आहे.एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १ लाख ६२ हजार ३४१ उच्चदाब ग्राहकांनी २२ हजार ६६४ कोटी रुपयांचा (१०० टक्के) भरणा ऑनलाइन केला धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशिर होणे किंवा अन्य अडचणी येणे आदी पूर्वीचे अडथळे पूर्णतः दूर झाले आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जळगाव परिमंडलामध्ये ११८.४४ कोटी (६१.२ टक्के) वीजबिलांचा ऑनलाइन भरणा झाला आहे.
लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास ०.२५ टक्के ( रू.५००/- पर्यंत) सूट प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन बिल भरणा आता नि:शुल्क आहे.