८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार प्रक्रिया
जळगाव ;- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणारे वयाची ८५ वर्ष पेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या मतदारांचे गृह भेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. जळगाव जिल्ह्यात गृह मतदानाला शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने अनुपस्थित मतदारांच्या घरोघरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेण्यासाठी ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, कोविड किंवा दीर्घ आजाराने बाधित असलेले रुग्ण यांचे गृहभेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण १६९४ मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचे फौज जिल्हाभरत तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात एकूण १६९४ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहे. त्यात वय वर्ष ८५ पेक्षा अधिक असलेले १३६७ तर ३२७ दिव्यांग मतदार यांचा समावेश आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात १३ व १४ नोव्हेंबर रोजी गृह भेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ६२ मतदार घरी बसून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.भुसावळ विधानसभा मतदारसंघात १२ व १३ नोव्हेंबर रोजी गृहभेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून एकूण २०१ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून एकूण १७३ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात 0८ ते 0९ नोव्हेंबर या कालावधीत गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ७० मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. रावेर विधानसभा मतदारसंघात १० नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेदरम्यान एकूण २१८ मतदार घरी बसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृहभटीद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रिया दरम्यान १०४ मतदार घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघात १४ व १५ नोव्हेंबर रोजी गृहभेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून २४२ मतदार घरी बसल्या मतदान करू शकणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ९ नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ११३ मतदार घरी बसल्या मतदान करतील. जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघात 8नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान १९० मतदार घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जामनेर विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात १४३ मतदार घरी बसल्या मतदान करू शकणार आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृह भेटीद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रिये दरम्यान १७८ मतदार घरी बसून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.