अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशयवरून एकाच्या घरात घुसून महिलेला व तरुणाला देखील मारहाण करून त्याच्या मोटरसायकलचे नुकसान केल्याची घटना दि. १३ रोजी संध्याकाळी ६ वाजता तालुक्यातील पातोंडा येथे घडली. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान कैलास पाटील हा रेशन दुकानावर आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेला होता. त्याची आई इंदूबाई घरी असताना हेमलता कुंभार, तिचे वडील रमेश बोमटू कुंभार, बहीण शुभांगी रमेश कुंभार, मुलगी वैभवी हेमलाल कुंभार हे घरात घुसले व समाधान कुठे आहे म्हणत शिवीगाळ व मारहाण करू लागले. तर रमेशने घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले. मुलगा समाधान रेशन दुकानावर गेला असे सांगताच ते सर्व दुकानाकडे गेले.
समाधान ग्रामपंचायतीजवळ थांबला असताना चौघांनी त्याला मारहाण करत मोटरसायकलचे नुकसान केले. गावकऱ्यांनी भांडण आवरल्यानन्तर, तुम्हाला सोडणार नाही म्हणत निघून गेले. इंदूबाई हिच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.