जळगाव शहरातील एम. जे. कॉलेजजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील एम. जे.कॉलेज परिसरामध्ये एका कार्यालयात पाच जणांनी एका तरुणाला चापटाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने आणि हातातील कड्याने मारहाण करून जखमी केले. शनिवार, २० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना विठ्ठल मंदिराशेजारी घडली. रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहन उमाकांत नेहते (वय २८ रा. गुरुकुल कॉलनी) हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी चार ते पाच तरुणांनी त्यांना तुझ्या भावाकडून पैसे घेणे बाकी आहे, तुझा भाऊ कुठे आहे, अशी विचारणा केली. भाऊ कुठे आहे हे नक्की मला सांगता येणार नाही, असे सोहन यांनी सांगितले. याचे वाईट वाटल्याने संशयित हे सोहन यांच्या अंगावर धावून आले.
त्यानंतर त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. एकाने हातातील लाकडी दांडक्क्याने तसेच हातातील कड्याने त्यांना मारले. सोहन यांच्या ऑफिसमधील वस्तूंची आदळआपट करुन संशयितांनी नुकसान केले. या प्रकरणी सोहन नेहते यांच्या तक्रारीनुसार संशयित कुशल राणे, नयन भारंबे, तीन अनोळखी (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.









