जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील घटना, ५ जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आयटीआयच्या भिंतीजवळ असणाऱ्या चायनीज विक्रेत्याला व त्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. तसेच एकाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद रामा रायपुरे (वय २३ रा. सिद्धिविनायक नगर, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. शनिवारी दि. १३ जुलै रोजी दुपारी साडेतीन ते ४ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी विजय मनबहादुर गुरखा (रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव) आणि त्याचे सोबत इतर संशयित संभा बारी (वय २८, रा. समता नगर, जळगाव), गोपाल, शंकर व पियुष गुरखा अशा पाच जणांनी आयटीआयच्या वसतिगृहाच्या भिंतीजवळ चायनीजची गाडी लावत असताना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी फिर्यादी विनोद रायपुरे यांना मारहाण केली.
त्याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी तक्रार देण्यासाठी गेले असताना घटनास्थळावर फिर्यादीचा भाऊ महेंद्र रायपुरे याला एकटा पाहून काहीतरी लोखंडी वस्तूने डोक्यात मारून जखमी करण्यात आले.(केसीएन)यामुळे फिर्यादी विनोद रायपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिता वाघमारे करीत आहेत.