जळगाव शहरातील घाणेकर चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील घाणेकर चौक येथे किरकोळ कारणावरून दोन जणांनी टेम्पोचालकाला लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी वजन मापाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिलीप अर्जुन चौधरी (वय ३१, रा. मराठे गल्ली ,धरणगाव) असे जखमी इसमाचे नाव आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. गुरुवारी दि. ४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दाणाबाजार येथे वस्तू भरलेला टेम्पो घेऊन दाणाबाजारातून निघत असताना संशयित आरोपी श्रीकांत प्रकाश मोरेकर (रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) याच्या मालवाहतूक गाडीला धडक लागली. त्यात मालवाहतूक वाहनाच्या दरवाजाचे नुकसान झाल्यामुळे संशयित आरोपीने फिर्यादीकडे नुकसान भरपाई मागितली.
यास फिर्यादी दिलीप चौधरी यांनी नकार दिला. यानंतर फिर्यादी हे पुढे जाऊन घाणेकर चौकात आले असताना संशयित आरोपी श्रीकांत मोरेकर आणि वासुदेव पितांबर माळी (वय ५४, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) यांनी त्यांच्या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावून त्यांचा रस्ता अडवला. तसेच फिर्यादीला टेम्पोच्या खाली ओढून लाथाबुक्क्यांनी पोटात व छातीवर मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फळ विक्रेत्याकडील लोखंडी वजन माप उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला शुक्रवार दि. ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता सुमारास खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे. दरम्यान दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.