जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोहाडी गावात बचत गटाचे काम घेऊन गेल्याचे कारणावरून एका तरुणासह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी दि. १९ जून रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी २० जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद जगन्नाथ ठाकूर (वय-३७ रा. रायसोनी नगर जळगाव) हा तरुण पत्नी ज्योती ठाकूर यांच्यासह वास्तव्याला आहे. मिलिंद ठाकूर हा त्याच्या पत्नीसोबत बुधवारी दि. १९ जून रोजी रात्री ९.३० वाजता मोहाडी येथील त्याची मावशी लक्ष्मीबाई ठाकूर यांच्या घरी बचत गटाचे कामानिमित्त आलेला होता. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे कल्पना गुप्ता व त्यांचा मुलगा यांनी दोन्ही रा. जिजाऊचौक, जळगाव हे रिक्षातून लक्ष्मीबाई ठाकूर यांच्या घरी आले. त्यावेळी मिलिंद ठाकूर व त्याची पत्नी ज्योती ठाकूर या दोघांना शिवीगाळ करत दोघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी मिलिंद ठाकूर यांनी गुरुवारी २० जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात कल्पना गुप्ता व त्यांचा मुलगा दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करीत आहे.