मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
मुंबई ( वृत्तसंस्था ) ;– मराठा नेते मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मोठं विधान केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटले की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले कि , “मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे.
त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.