कोल्हापूर (वृत्तसंथा) – मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, 6 ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.
यावेळी पाटील यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विवेक रहाडे या विद्यार्थाची आत्महत्या हे त्याचे एकट्याचे बलिदान नाही. या बलिदानातून आता तरी सरकारने जागे व्हावे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, असं सांगतानाच सरकारने एसईबीसी दाखले देण्याबाबतचा संभ्रमही दूर करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. हा बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही त्या दिवशी खळखट्ट्याक करू नये, असं आवाहन पाटील यांनी केलं.