नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळची घटना
मनमाड (प्रतिनिधी) :- राज्याचे मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे दोन मित्रांसोबत घरी परत येत असताना त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून अपघातानंतर दुसऱ्या वाहनातील व्यक्तींनी अविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत मालेगाव- सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे परत येत होते. यावेळी टेहेरे चौफुलीजवळ मागून दोन वेगवेगळ्या वाहने येत होती. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तसेच त्यांच्या वाहनाला डीव्हायडरकडे दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या वाहनातील संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोणेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला.
या सर्व गोंधळात भुसे यांची गाडी डीव्हायडरमध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. तर २ वाहणेदेखील डीव्हायडरला ठोकल्या गेल्या. या अपघातामुळे त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येवून त्यांनी त्या संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली.
यात एका वाहनांमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढळून आले. हे गो तस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.